बालपणीची दिवाळी



बालपणीची दिवाळी......

                           लहानपणी दिवाळी आली की आठ दिवस अगोदर आम्ही वस्तीवरची सारी पोरं जमून रोज प्रत्येकाच्या घरी जाऊन गायांना ओवळायचो . त्यांच्यासमोर दिवाळीची गाणी म्हणायचो. एक दगडाचा दिवा असायचा आमच्या घरी तो लाऊन लावून रोज गायांची पूजा करायचो व त्यांच्या समोर दिवाळीची गाणी म्हणायचो. दिवा लावण्यासाठी रोज एक एक जनाचा नंबर असायचा तेल आणण्याचा. जवळ जवळ सगळ्यांच्याच घरी दोन ते तीन गावरान गाया हमखास असायच्या. आमच्या घरी तर सहा ते सात नेहमी असायच्या. आता एकच उरली आहे. दिवाळी होईपर्यंत रोज आम्ही गाया समोर गाणी म्हणायचो. सर्वच गाणी आठवत नाहीत आता पण जी लक्षात आहेत ती पुढीलप्रमाणे..

१. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...

२. साधू माधु पेल्यात ताक, ताक पेऊन पडल्यात गार

३. गाय येली मोरी ग्यानबा ,मोरीला झालाय गोऱ्हा 

४. नऊ नऊ दारानं, नऊ नऊ पिलं हो

या सारखी अनेक गाणी आम्ही रोज गायांना ओवळताना म्हणायचो त्यातलच हे एक पाठ असलेलं गाणं एक आठवण म्हणून

"माझी गवळण गाय"

माझी गवळण गाय बरीहो.......
दूध देती चर चरीत..
नाना बरीत..
पंढरपुरीत...
देव बाय भरीत....

माझ्या गवळण गाईची सिंगे
जशी महादेवाची लिंगे...
माझी गवळण गाय बरीहो....

माझ्या गवळण गाईचे डोळे
जसे लोण्याचे गोळे
माझी गवळण गाय बरीहो...

माझ्या गवळण गाईचं कान
जसं नागणीच पान...
माझी गवळण गाय बरीहो....

माझ्या गवळण गाईचं पॉट
जसं कापसाच रॉट...
माझी गवळण गाय बरीहो.....

माझ्या गवळण गाईची पाठ
जशी सोलापूरची वाट...
माझी गवळण गाय बरीहो....

माझ्या गवळण गाईची कास
जशी तांदळाची रास
माझी गवळण गाय बरीहो....

माझ्या गवळण गाईची शेप
जशी नागणीची झेप...
माझी गवळण गाय बरीहो.....
दूध देती चर चरित....
नाना बरीत....
पंढरपुरीत....
देव बाय भरीत....

       यातीलच एक गाणं "गाय येली मोरी ग्यानबा, मोरीला झालाय गोऱ्हा" हे भाऊराव कऱ्हाडे यांचा राष्ट्रीय विजेता चित्रपट " ख्वाडा" यात चित्रपटाच्या शेवटी आपल्याला ऐकायला भेटतं. कारण भाऊराव कऱ्हाडे सर माझ्याच पारनेर तालुक्यातील आहेत. 

गावरान गायांना मोरी, बांडी, गवळी, हरणी, ढवळी,राणी, सुग्री, अशी प्रेमानं आपल्या लेकरांप्रमान नावं ठेवली जायची.

            साधारणतः नव्वद च्या दशकापर्यत ही गाणी म्हणायची व गायांना ओवाळायची परंपरा टिकून होती. त्यानंतर मला वाटतं खेडे गावात गावरान गायचं प्रमाण कमी कमी होत गेलं अन जर्सी गाईचं फॅड कधी येऊन आपल्या घरात येऊन बसलं हे आपल्याला कळलं सुद्धा नाही. शेतीला जोड धंदा म्हणून लोकं दूध व्यवसायकडं वळू लागली अन दावणीची गावरान गाय कमी होऊ लागली. गावरान गाईपेक्षा जर्सी गाय जास्त दूध देत असल्यामुळे आपोआपच लोकांची मानसिकता बदलू लागली. दहा गावरान गायांच दूध दोनच जर्सी गाईकडून मिळू लागलं. लोकांना दूध व्यवसायातून येणारा पैसा दिसू लागला. अन हळू हळू गावरान गाईचं प्रमाण कमी होऊ लागलं. त्यात ट्रॅक्टर चा जमाना ही त्याच काळात येऊन गेला. अन शेती करणं आणखी सोपं होऊन गेलं. बैलांनी करत असलेल्या नांगरटी टॅक्टर आल्यामुळे बंद झाल्या. बैलगाडा शर्यती बंद झाल्या. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे गावरान गायचं महत्त्व आपोआपच कमी होत गेलं. त्यात बागायत शेती जास्तीत जास्त होऊ लागली. लोकांना गुर सांभाळायला वेळ कमी पडू लागला. माणसं कमी पडू लागली गावकडली माणसं नोकरी पाण्यासाठी शहराची वाट धरू लागली. घरात जर दोन किंवा तीन भाऊ असले तर त्यातला एकच जण शेती व बाकी नोकरीच्या शोधत शहरात गेल्यामुळे घरातली माणसं कमी झाली. अन मला वाटतं मानसातली माणुसकी सुद्धा कधी हरवून गेली हे आपल्याला देखील कळलं नाही......

             दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की रोज सकाळी रानात जाऊन गुरांसाठी गवत आणायचं काम सगळ्यांना लागायचं. या दिवसात गवत ही खूप वाढलेलं असायचं. गवताचा भारा बांधण्यासाठी आणलेलं चऱ्हाट ( दावं) कुठं हरवू नये म्हणून सारी पोरं कंबरेला घट्ट बांधायची. अन विळा घेऊन साऱ्या रानात पांगायची. पण लवकर गवत घेऊन यायचं असेल तर सरळ आम्ही एखाद्याच्या इराडाच्या वावरात( मठ, हुलगा, काऱ्हाळ आणि तूर एकत्रित पेरलेल्या वावरात) घुसायचो मोक्कार कुर्डु ,दिवाळ्या, हारळ,शेवरा अशी गवतं असायची. प्रत्येकाला गवताचा भारा जसा झेपेल तसं प्रत्येकजण आपापल्या परीने गवत घ्यायचो. कधी कधी लोकांच्या बांधावरच्या गवतावरच डल्ला हनायचो. दुसऱ्या दिवशी मात्र हमखास शिव्या बसायच्या ज्याचा बांध कापला जायचा त्याच्या. गवत घेण्यासाठी सारेजण इकडे तिकडे पांगायचे . मात्र गवताचे भारे बांधण्यासाठी सारी पोरं एकत्रित जमायची एखाद्या बाभळीच्या झाडाखाली. प्रत्येकजण आपली गवताची मूठ मूठ गोळा करून सारं गवत एकत्र जमा करायची. साऱ्यांच गवत घेऊन झाल्याशिवाय कोण्हीच गवताचा भारा बांधत नसायचं. सगळेजण एकत्र जमले की मग आपापले गवताचे भारे बंधायचो. मग एकमेकांना तो भारा डोक्यावर घेण्यासाठी मोठी कसरत करावा लागायची. कधीच कोन्हाला स्वतःचा भारा उचलता आला नाही. एक दोघ जण मदत करायचे भारा उचलून देण्यासाठी. गवत घेऊन घरी यायला नऊ ते दहा हमखास वाजायचे. घरी आल्यावर एखादा क्रिकेटचा डाव व्हायचा. या दिवसात श्यक्यतो सकाळचा डाव रद्दचं होयचा आमचा. संध्याकाळी मात्र फुल डाव रंगायचा. पार अंधार पडेपर्यंत क्रिकेट खेळणं चालू असायचं. कधी कधी चेंडू हरवला की मगच डाव बंद होयचा. हरवला म्हणजे अंधारात चेंडू सापडतच नसायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पहिलं हरवलेला चेंडू गवसायचं काम लागायचं. संध्याकाळचा क्रिकेटचा डाव मोडला की सुरू होयची आमची तयारी गायांना ओवाळायची.

                       दिवाळीत नवीन कपडे फक्त मामाकडं गेले तरच भेटायचे. घरी कधीच दिवाळीला कपडे घेतले नाहीत. मग मामाकडे जाण्यासाठी आम्हां दोन भावात भांडण चालायची. मी लहान असल्यामुळे शक्यतो माझाच नंबर लागायचा लागायचा मामाच्या गावाला जायचा. दिवाळीच्या दिवशी सकाळीच फटाके आणण्यासाठी निदान तास भर तरी बोंबलत ( रडत ) बसावं लागायचं. तेव्हा कुठं पन्नास किंवा शंभर रुपये काढून द्यायची आई. दोन चार शिव्या हमखास खाव्या लागायच्या. म्हणायची कशाला रं फटागड ना व्हाटाला न पॉटाला. काय पॉट भरलं का त्यानी. ते पण आम्हा तीन भावात वाटून घ्यावा लागायचं. त्यात मग लवंगीच्या लडी जास्त असायच्या . कारण सर्वात स्वस्थ म्हणजे लवंगीच. मोठ्या भावा साठी एखादी लक्ष्मी ची लड असायची. तीन भावांना मोजून तीन पाऊस , तीन रॉकेट न तीन भुईचक्र असायचे. त्यातलंच पुरून पुरून वापरा म्हणायची आई. ओवाळीला राहुद्या वाजायला म्हणायची. दिवाळीच्या आधल्या दिवशीच आई सगळं सडा सारवन करायची. गावातली चांदाबाई कुंभारीन घरोघर पाच पाच पणत्या वाटायची. त्या व्यतिरिक्त एक ही पणती विकत आणली जायची नाही. त्याच पणत्या दिवाळीच्या दिवशी लावल्या जायच्या. एक तुळशिजवळ, दरवाज्याच्या दोन बाजूला दोन देवळी असायच्या पणती विजू नये म्हणून देवळीतच पणत्या ठेवायला सांगायची आई. एक गाईच्या गोठ्यात लावली जायची तर एक लक्ष्मीपूजन जवळ ठेवली जायची. 

                            दिवाळीच्या दिवशी किंवा त्या अगोदर कधीच फराळ बनवत नसायची आई. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच आम्हां तीन भावांना घेऊन रात्रभर आई फराळ बनवायची. आम्हां तीन भावांना काम वाटून दिली जायची. मोठ्या भावाकडे बाकुस तयार करायचं काम असायचं. आई करांज्याच व शंकरपाळ्याच पीठ मळून द्यायची. आईची करंजी लाटून झाली की त्यात बाकुस भरून करंजी तयार करायचं काम माझ्याकडं असायचं. मधल्या भावाकड शंकरपाळ्या तयार करायचं काम असायचं. तो बाकुस भरायचा चमचा दिवळीलाच आई बाहेर काढायची. त्याला घवसण्यातच कितीतरी वेळ निघून जायचा. सकाळी दिवस ऊगेपर्यंत फराळ बनवायचं काम चालायचं. दहा ते पंधरा दिवस पुरेल इतकं आई फराळ बनवायची. भाऊबीजेच्या दिवशी चुलत बहिणी व मावस बहिणी यायच्या ओवळायला. कंबरच जून करगुट सोडून नविन करगुट बांधलं जायचं. कंबरवं गोंडा उडवत पळायला मज्जा वाटायची लहानपणी. पण नंतर नंतर त्याच गोंडयाची लाज वाटायची म्हणून गोंडा कापून करगुटा बांधायला लागायचो. आई म्हणायची बिना करगुट्याची कंबार आसल तर गाढव बोंबलत म्हणून. त्यामुळे सगळेच नवीन करगुट बंधायचो. दुपारच्या नंतर ओढ लागायची ती मामाच्या इकडं जायची. त्याचा फायदा आई चांगलाच उचलायची. रानात काही काम राहिलं असेल तर ते हमखास आमच्याकडून त्या दिवशी पूर्ण होयचं. आई म्हणायची तेव्हढं काम झालं की लगेच आपल्याला मामाच्या घरी जायचं म्हणून. हा किस्सा मी माझ्या "ओढ" या कथेत लिहला आहे. मी कांदे लावायला भाऊबीजेच्या दिवशीच शिकलो होतो. मामाच्या इकडं जायचं म्हणून कांद लवकर लावून झालं पाहिजे ना. दिवाळी म्हणजे कांदा लागवडीचा फुल सिजन असायचा. रानातल काम उरकून मामाच्या घरी जायला पार अंधार पडायचा. पण त्यातच खरी मज्जा असायची. एक दोन दिवस मामाच्या घरी राहून नवे कपडे घालून परत गावाला आलं की दिवाळी संपल्याची चाहूल लागायची. घरातलं फराळाच डबं अर्धालं झालेलं दिसायचं. कधी लाडू संपल्याल दिसायचं तर कधी करंज्या. सगळ्यात शेवटी चिवडा संपला जायचा. अन दिवाळीचा ही शेवट व्हायचा.....

जिवन धापसे 
मु. पो. पिंपळगाव कानडा,ता. गेवराई 
जि. बीड
7279828384

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!