निरागस आणि मनातल्या रामा सोबतं इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..
निरागस आणि मनातल्या रामा सोबतं इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं.. साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, *"व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?" मास्तर मंजे कंडक्टर.* मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं. *आरं देवा... मंग तिकीट??* त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय. *मग आता???* "तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही." *"दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.* *त्ये मरुदे त...