रानमेवा
रानमेवा आमचं एकत्र कुटुंब होतं .अल्प शेती व घरात माणसं फार असायची. त्यामुळे कष्टाच्या कामाची विभागणी ही प्रत्येकालेच वाटून देली होती.आमचा बाप घरचं करून दुसऱ्याच्या खटल्यात हप्तेवारी काम करायचा.कधी सवड भेटलीच तर घरच्या बैलबंडीत घरच्याच वावरात शिल्लक पिकलेलं हायब्रीड ज्वारीचे दोन,चार पोतं घेऊन आजूबाजूच्या बाजारातही ईकायला घेऊन जायचा.मीही सोबत जायचो.तेव्हा आताच्या सारखं गव्हाच्या पेक्षा ज्वारी वरचढ नव्हती. फक्त तिन रूपये किलो भाव होता.एक दोन पोते खपले म्हणजे शेपाचशे रुपये भेटत.तेवढाच पैसा बजारहाटाले कामी यायचा. बाप निरं,पिरं झालं म्हणजे बजारहाट करायचा. तोपर्यंत चांगला तापलेला सुर्य लाललाल जर्द होऊन मावळतीले लागायचा. मी बैलबंडी राखायचो. बाजाराच्या एका कोपऱ्यात सोडलेल्या बैलबंडीतून मी चाकाचे बैल सोडून जवळच्या हौदावरून पाणी पाजून आणायचो.व संग आणलेली कडब्याची पेंडी बैलाईपुढे टाकायचो.व बंडीत बसून गुळाच्या भेल्या ईकणारे,शेव चिवडा ईकणारे,भाजीपाला,जवसाचं, मद्रास,खोबऱ्याचं तेलाचे डबे घेऊन ईकणाऱ्याचं बारकाईनं मी निरिक्षण करायचो. ज्वारीले तेव्हा पीवर गरीबाचं खाद्य समजल्या ज...