चाहूल दिवाळीचीकुठे गेले ते दिवस
चाहूल दिवाळीची कुठे गेले ते दिवस एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची. दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे. किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड' राखण्यात !! फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा. फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी, लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची. एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !! 'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे' - आज...