तुमच्याही तुमच्या आईविषयी अशाच भावना आहेत का?
तुमच्याही तुमच्या आईविषयी अशाच भावना आहेत का? अवश्य सांगा... आई ! तुला दीडशे रुपयाची काठी आणुन दिल्याचा आंनद माझ्यापेक्षा तुलाच जास्त झाला तुझा हाच आनंद माझ्या काळजात कालवाकालव निर्माण करून गेला. डोईवर पन्नास किलोचे ओझे घेवुन झपझप चालतानाची तू ... मला सर्रकन आठवली... मी पाचवीत असताना ... माझा हात मोडला होता .. तेव्हा... मला पाटकुळी घेउन चालत गेली होतीस तीस किलोमीटर ... आज तुला जीना उतरतानाही लागतो आधार 100 मीटर चालल्यावरसुद्धा जातेस थकून मनाने.. सगळयांच्या आधी उठून आणायचीस सरपण तोडून .. चुलीचा जिव जाळण्यासाठी... जात्याला सुद्धा लावायचीस वेड फिरवून फिरवून .... हल्ली होतो तुला त्रास साधी कुस बदलतानाही बारा लोकांची कालवण भाकर पाटीत घेवुन जायचीस उन्हातान्हात अनवाणी पाटावरल्या साहेबांसाठी.. आता घरातल्या टाईल्सचाहि त्रास होतो तुझ्या कणखर पाऊलांना... बारा परसाच्या विहिरीतून शेंदायचीस पाणी अंधाराच्या डोळ्यात बोटे घालून तुला हल्ली लागतो चष्मा माणसे ओळखायलाही आता मागतेस लहान तांब्या पाण्याचा .... थरथरणार्या हातांनी उचलत नाही म्हणून . खातेस कशी बशी भाकर......