'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा.
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा. मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात. पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील...