पाखऱ्याची आठवण ....!
पाखऱ्याची आठवण मगाशी रोहित ने हा फोटो पोष्ट केला अगदी खरच गलबलून आले, हो खरच . पाखऱ्या आणि गुण्या अशी जोड आमच्याकडे होती , पोळा केवळ एक दिवसाचा सण नसायचा , पंधरा दिवस सूत कातला जायचे , मुंगसे वेसनी झुकी याची लगबग असायची . म्हणून ज्याला आम्ही बैल म्हणतो ना तो ते केवळ पशु नसायचा घरातला एक सदस्य असायचा . पाखऱ्या ला वैरण टाक , पाखऱ्याला पाणी दाखवलं का , या थोरल्या वाक्यात काळजी असायची . खांदा मळणी ला बैल पोहनी लावायची एक लकब असायची आणि त्या निमित्ताने घरातल्याच्या मान्यतेने पोहण्याची आम्हाला ही संधी . सगळं अगदी निरागस आणि श्रद्धेने असायचे बैलांना कसला पोळा कळतो मात्र शेतकरी या एका दिवशी वर्षाचे त्याचे ऋण व्यक्त करायचा . वेशीतून पहिले बैल ज्याचे निघायचे त्याचा मोठा मान असायचा . दिवसभर आसरा मसुबा माळावरचा दर्यातला असे सगळे देव आणि मारुतीला सवते नारळ फोडली जायची . सगळी नारळ फोडायला घरच्या एका विशेष व्यक्तीची नेमणूक असायची कारण सगळे देव म्हणजे गावचा अर्धा शिवार पायदळी तुडवायचा तो ही चिखलात , म्हणजे पोळा आणि पाऊस म्हणजे ठरलेली गोष्ट . मग वायरची पिशवी नारळाच्या तुकड्याने फुल भरायची...