उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता.
उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्यांनी महसुल मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १५६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी विधान परिषदेत लावून धरला. सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्यासमवेत मंत्र्यांच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या, मात्र यातून मार्ग निघाला नाही. शेवटी सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. याचिकेत दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने आदेश पारीत करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आले. मा.सर्वोच्च न्यायालयातील स्पेशल लीव्ह अपिल क्र.१७९०२/२०१९ मध्ये गेवराईचे भुमिपूत्र ॲड.दिलीप अण्णासाहेब तौर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू मांडली. मा.सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हिताचे आदेश पारीत करताना मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यास नकार देत बँक व विमा कंपनीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. दरम्यान बँकेने पुन्हा याच प्रकरणात मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दिवाणी अर्ज क्र.५४२७/२०१९ दाखल केल्याचे समजते, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पुर्ननिरीक्षण करण्याची मागणी बँकेने केली आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयात सन २०१९ पासून आजवर विविध सुनावणी दरम्यान उमापूर महसुल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आपण केली होती. अखेर मा.सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने आदेश पारीत केल्यामुळे आता उमापूर महसुल मंडळातील उमापूर, गायकवाड जळगाव, मालेगाव, बोरगाव, शेकटा, भाटआंतरवाली, बोरीपिंपळगाव सह आदी गावांतील पिक विमा रक्कम भरणा केलेल्या १५६२ शेतकऱ्यांना सुमारे ५ कोटी रुपयांहून अधिक पिक विमा नुकसान भरपाई व्याजासह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून सुरु केलेल्या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान यानिमित्ताने होत आहे.
Comments
Post a Comment
JD