पाखऱ्याची आठवण ....!
पाखऱ्याची आठवण
मगाशी रोहित ने हा फोटो पोष्ट केला अगदी खरच गलबलून आले, हो खरच . पाखऱ्या आणि गुण्या अशी जोड आमच्याकडे होती , पोळा केवळ एक दिवसाचा सण नसायचा , पंधरा दिवस सूत कातला जायचे , मुंगसे वेसनी झुकी याची लगबग असायची . म्हणून ज्याला आम्ही बैल म्हणतो ना तो ते केवळ पशु नसायचा घरातला एक सदस्य असायचा . पाखऱ्या ला वैरण टाक , पाखऱ्याला पाणी दाखवलं का , या थोरल्या वाक्यात काळजी असायची . खांदा मळणी ला बैल पोहनी लावायची एक लकब असायची आणि त्या निमित्ताने घरातल्याच्या मान्यतेने पोहण्याची आम्हाला ही संधी . सगळं अगदी निरागस आणि श्रद्धेने असायचे बैलांना कसला पोळा कळतो मात्र शेतकरी या एका दिवशी वर्षाचे त्याचे ऋण व्यक्त करायचा . वेशीतून पहिले बैल ज्याचे निघायचे त्याचा मोठा मान असायचा . दिवसभर आसरा मसुबा माळावरचा दर्यातला असे सगळे देव आणि मारुतीला सवते नारळ फोडली जायची . सगळी नारळ फोडायला घरच्या एका विशेष व्यक्तीची नेमणूक असायची कारण सगळे देव म्हणजे गावचा अर्धा शिवार पायदळी तुडवायचा तो ही चिखलात , म्हणजे पोळा आणि पाऊस म्हणजे ठरलेली गोष्ट . मग वायरची पिशवी नारळाच्या तुकड्याने फुल भरायची . शेंदूर आणि हिंगुळ या खरेदीने देव आणि बैलाची शिंगे रंगायची . मोठ्या घरी बैलाचे लग्न लावली जायची , पडत्या पावसात गड्यांची लगबग असायची बैल बांधून परत घरी येऊन जेवायची . पुरणपोळी कुरडया आमटी गुळवणी भात भजे असा तो बेत असायचा . आमच्या लहानपणी चपाती म्हणजे सणालाच एरवी भाकरी , आजकाल भाकरी सनासारख्या असतात , त्यामुळे सण आता केवळ नैमित्तिक बनले हे दुर्दैवी सत्य आहे . तरीही गावाकडे आज ही पशूंची कृतज्ञतापूर्वक पूजन ही मानवी मूल्यांची साक्ष आहे .
दुष्काळ आणि लम्पि चे सावट असल्याने अनेक गावात हा उत्साह कमी दिसला तरी या दिवसाचे महत्व मात्र कायम असेल , आमच्याकडून नेहमीच कामाच्या पात्राची दखल होतेच असे नाही , बिनकाम्या माणसाला आम्ही बैल म्हणून बैलाचा किती अवमान करतो या निमित्ताने आम्ही विचार केला पाहिजे , भारतीय कृषीच्या विकासात बैलाने गाडा हाकला असताना आम्ही देश समाज म्हणून बैलाचा आदर करत नाही , राष्ट्रीय पक्षी मोर बिन कामाचा राष्ट्रीय प्राणी वाघ ज्याचा आमच्या आयुष्यात भय देण्यापालिकड काही काम नाही , बैल राष्ट्रीय प्राणी का नसावा , ज्याने भारताची शेती केली 75 वर्षे कसली त्या बैलाच्या प्रति सन्मान दिला पाहिजे , मात्र तसे न होता कुत्सुक वृत्ती ला आम्ही चक्क कष्टकरी बैलाची उपमा देऊन बैलाचा अवमान करतो .
असो आज रोहित च्या पोष्ट ने पाखऱ्या आठवून दिला , गळ्यातल्या घणगाळ आठवलं , मराठीत पाखऱ्या नावाचा धडा होता अगदी तसाच पाखऱ्या होता , पहिले गोठ्यातला बैल गेला तर घरात दुःख व्हायचा , घरातले चार माणसे दोन थेंब गाळायची कारण , शेतकरी बापाचा हात चाटणारा पाखऱ्या आणि शिवळाट मधून मान बाहेर काढल्यावर मांद चोळणारा बाप , आणि मागे पुढे मान करत चुरम चुरम गवत खाताना बांध चालणारी बाप बैलाची जोड , आमचा ठेवा आहे .
पोरांनो हे जपले पाहिजे .
Comments
Post a Comment
JD