अन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा .
अन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा
मानवाच्या उत्क्रांतीस आरंभ झाल्यानंतर लागतलेला अग्नीचा शोध जितका महत्वाचा होता त्याही पेक्षा अधिक महत्वाचा शोध हा चाकाचा शोध होता. आदीम काळात जंगलामधून राहणाऱ्या मानव प्राण्याला कित्येक शतके भटक्या टोळया घेऊन रहावे लागले मात्र चाकाचा हा शोध त्याचं आयुष्य स्थिरावणारा ठरला... त्याच सुमारास बैलांच्या सहाय्याने शेतीचे तंत्र मानवाला उमगले आणि त्यानंतर संपन्न अशा संस्कृतीचा जगात वेग वेगळया ठिकाणी उगम झाला.
आज यंत्रांच्या सहाय्याने शेतीचे तंत्र गवसले असले तरी शतकानुशतके बैलांच्या सहाय्याने शेती होत आली असल्याने त्यांच्या असणाऱ्याला एक आगळे महत्व आहे. सण - उत्सवी परंपरांच्या आपला भारत देशात आजही ग्रामीण बाज कायम आहे. त्यामुळे श्रावणी आमावस्येला साजरा होणारा बैलपोळा सण या परंपरेतील एक महत्वाचा सण ठरतो.
आपल्या आयुष्यात अन्नधान्य पिकविण्यात ज्याची मदत होत असते त्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण महाराष्ट्राची खास ओळख बनलेला आहे.
बैलासाठी हा पुर्ण विश्रांतीचा दिवस पोळयाच्या आदल्या दिवशी बैलाला आवतन देण्याची परंपरा आहे. त्यानंतर बैलांना जवळच्या पाणवठयावर अंघोळ घालण्यापसून पोळा सुरु होतो. बैलांना शेतीत वापरताना त्यांच्या खांद्यावर नांगर टाकून कठीण काम शेतात होते. त्या खांद्याला तूप -हळदीने आराम पडावा यासाठी खांदेमळणी केली जाते. यानंतर बैलांच्या पाठीवर नक्षीकाम असणारी शाल पाघरतात ज्याला झूल म्हटले जाते. बैलांना सजवताना त्यांच्या शिंगाना बेगड लावणे गळयात घुंगरांच्या माळा तर कधी घंटा बांधणे अशा पध्दतीने सजलेल्या बैलांना मग खास महाराष्ट्रीयन पदार्थ असणारा पुरण पोळीचा नैवेद्य...मग गावातील सर्व बैल एकत्र करुन वेशीजवळच्या मारुती मंदिरापर्यंत आणली जातात गावतल्या मानकाऱ्यांचा बैल समोर ठेवून 'पोळा' फुटतो मग चालू होते ती वाजंत्री, ढोल-ताशे, सनई आणि नव्या पध्दतीस डी.जे. वाली मिरवणूक... जो या बैलाला घेऊन चालतो तो बैलाचा बोजा सांभाळतो म्हणून त्याला बोजारा म्हणून पैसे देण्याची पध्दत अनेक भागात आहे.
राज्यात सर्वच गावांमध्ये हा बैलपोळा साजरा होतो. ज्यांच्या घरी असे बैल नाहीत अशा घरातही बैलाची मातीने बनवलेली प्रतिकृती पूजेसाठी वापरली जाते पूर्व पोळयाच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांना घेऊन त्यांच्या हाती बैलांच्या लाकडी प्रतिकृती घेऊन सांस्कृतिक जलसा आणि स्पर्धा होते याला तान्हा पोळा म्हणतात. यात उत्तम सजावटीसाठी बक्षीसे देखील दिली जातात.
पोळा सण निसर्ग आणि मानव यात असलेल्या प्रत्येक संबंधाला अधोरेखित करतो. काही वर्षांपूर्वी पूर्ण शेतीची कामे बैलांच्या मदतीने व्हायची . शेताला पाणी देण्यासाठी देखील बैलांचा वापर व्हायचा. चामडयापासून तयार केलेल्या पखालीसह विहिरीतून खेचण्याचे काम बैलांच्या मदतीने केले जाई . हे अतिशय पर्यावरण पूरक होते. यातून भूजल साठा मर्यादीत प्रमाणातच वापरला जात होता.
काळ बदलल्यानंतर विंधन विहीरी आणि शेतीपंपांनी उपसा सुरु झाला सोबतच भूजल साठवणूक रिती होत गेली. आजही बैलांच्या माध्यमातून शेतीचा पर्याय वापरला गेला तर सर्वांचेच भले होणार आहे. शतकानुशतके अन्नदात्या शेतकऱ्याचा हा सखा आजही मोलाचा आहे आणि पोळयाचा सण यासाठीच महत्वाचा आहे.
Comments
Post a Comment
JD